आई, बाबा, आणि सोशल मीडिया...


"ओळख पाहू ही  कोण?"

मी आईच्या हातातल्या फोन मध्ये डोकावलो. फोटोत एक तरुणी, सायकल वर स्वार, ट्रॅक पॅन्ट आणि टी-शर्ट  घातलेली, कॅमेऱ्याकडे पाहून स्मितहास्य करीत होती.

"अरे पाहतोयस काय नुसता, ओळख ना कोण आहे ही." पुन्हा आईने विचारले.

मी मक्खपणे मान हलवली. "मला नाही माहीत." 

"अरे, हि नमिता! छत्र्यांची!"

"बरं..."

"अरे बरं काय? तुझ्या शाळेत होती ही! नर्सरीत तुझा डबा खायची बघ? आणि तू उपाशी, रडत रडत घरी यायचास..."

नर्सरीत ही मुलगी माझ्या वर्गात होती, इथपर्यंत ठीक आहे. पण ती मला रडवीत असे, हे कशाला महत्त्वाचा होतं, कुणास ठाऊक.

"आता हिला ओळख..."

"अगं  आई काय तू..." 

"हे बघ, प्रिया, अनघा, अगदी तुझ्या पक्या चे सुद्धा फोटो आहेत माझ्या फोन वर!" आई अभिमानाने म्हणाली.

"पक्या?"

"पंकज पाध्ये रे, नववीत तुझ्या वर्गात होता तो? तो थायलंड ला असतो, बरीच वर्ष झाली आता. एक दोन वर्षात कॅनडा ला शिफ्ट व्हायच म्हणतोय."

मी आ वाचून आई कडे पहातच राहिलो! माझा हा नववीतला मित्र, माझ्या ही संपर्कात नव्हता सध्या. इन फॅक्ट मी पक्याला साफ विसरलोच होतो.

"तुला बरी माहिती माझ्या सगळ्या मित्र मैत्रिणींची," मी आईला म्हणालो.

"मग काय! मी फ्रेंड आहे ना त्यांची!"

"फ्रेंड?"

"फेसबुक वर रे."

"तू फेसबुक वर आहेस?" मी आश्चर्याने विचारलं. 

"हो! अरे तू हॉस्टेल ला गेल्यावर घर खायला उठलं मला! रोज रोज तुझ्या बाबांशी किती बोलायचं? आणि काय बोलायचं रे? मग एक दिवस शेजारच्या शालिनी शी बोलताना तिने विचारलं, काकू, तुम्ही फेसबुक वर का नाही आहात? तुमचं मस्त मन रमेल तिथे. तिनेच दाखवलं मला कसं अकाउंट सेट उप करायचं ते... आणि खरंच, किती मस्त आहे रे हे फेसबुक!
तुला माहीत आहे? तुझ्या कॉलेज चे डीन आहेत ना, करमरकर? ते हि आहेत माझे फ्रेंड फेसबुक वर!...."

"डीन करमरकर! आई?"

"अरे, ती ना एक गम्मतच आहे. तुझ्या कॉलेज चा डीन वैशाख करमरकर, माझ्या बरोबर कॉलेज मध्ये होता! इतक्या वर्षांनी मला तो फेसबुक वर सापडला! मग आम्ही फ्रेंड्स झालो. तेव्हा कुठं मला काळाले तो आता डीन झालाय!"

मी थक्क झालो. मला कळेना, मला जास्त आश्चर्य ह्याचे होते कि आई फेसबुक वर आहे? कि ह्याचे कि ती माझ्या डीन सोबत कॉलजे ला होती...कि ह्याचे, कि माझ्या मित्र मैत्रिनींना माझ्या आईने फ्रेंड रिक्वेस्ट्स पाठवल्या होत्या!

"ए राहुल, तू सप्टेंबरला घरी येशील ना, तेव्हा..."

"मी सप्टेंबर मध्ये घरी येणारे, हे तुला कुणी सांगितलं?"

"इश्श, सांगायला कशाला हव कुणी? माहितीये कि मला. तुझ्या डिग्री कॉलेज च्या मित्रांनी रियूनियन ठरवलंय ना? मी वाचली तुझी कंमेंट. रियूनियन नंतर मारिन ड्राइव्ह ला जाणार आहेत ना सगळे? त्या बगळ्या पासून सावध राहा हो!"

"आम्ही प्रसाद ला बगळ्या म्हणतो हे तुला कसं... असुदे...."

"आणि रिचा कोण रे?"

आईने बाउन्सर टाकला.

"री... री... रिचा?"

"हो, तू बगळ्या ला विचारलस कि तुझ्या कॉमेंट मध्ये. रिचा येणार आहे का रियूनियन ला? तुझ्या कॉलेज मध्ये होती?" आईने भुवया उंचावल्या आणि प्रसन्न चेहेर्याने माझ्याकडे पाहिलं.

सुदैवाने लगेच माझा फोन वाजला! 'मी आलोच..." म्हणत मी बाहेर बाल्कनी वर आलो.

*****

"आज बाहेर जायचे प्लॅन करू नकोस. वेस्टर्न लआईन च्या गाड्या बंद आहेत. आणि ठाण्याला पाऊस कोसळतोय."

बाबा नेहमी प्रमाणे बालकनीत बसले होते. त्यांच्या हातात नेहमी प्रमाणे फोने होता.

"तुम्हाला कुणी सांगितलं?" मला उत्तर ठाऊक होतं, तरीही मी विचारलं.

"व्हाट्सअँप आलाय कि जोश्याचा. त्याचा मुलगा पण सुट्टी साठी घरी आलाय ना. त्याला माहितीये तू हि आलायस ते."     

"बरं" मी मान डोलावली.

"आणि ऐक, आज तुला सकाळी मेसेज केला होता, पाहिलास? लॅपटॉप गादि वर ठेवून चार्जे करू नकोस. स्वीच बंद करायचा विसरून रूम बंद करून जाशील बाहेर आणि गादि पेट घ्यायची!"

"नाही हो बाबा. मी ठेवीन लक्ष..."

"आणि, काल फॉरवर्ड पाठवला होता, पाहिलास का? ती पुस्तकांची साईट? बघ तुझ्या अभ्यासाची पुस्तक फुकट मिळतायेत म्हणे तिथे..."

"अहो, बाबा, ती साईट जेन्युईन नाहीये... आणि तुम्ही वव्हाट्सअँप वरचे सगळे मेसेजेस सिरिअसली घेऊ नका हो. सगळेच काही खरे नसतात."

*****

काही दिवसांनंतर -

"आई! मी जाऊन येतो!"

"जपून जा, अन रात्री उशीर करू नकोस! सकाळची लवकरची बस आहे ना तुझी?"

"हो, मी येईन वेळेत..."

"आणि, राहुल, थांब! एक जरा... "

"काय?"

"त्या रिचा चं नुकतच ब्रेक अप झालय. तो मुलगा नालयाकच होता म्हणा. पण, सध्या, जरा सॉफ्ट आहे ती त्या मुळे. येणारच नव्हती रियूनियन ला. कशीबशी तयार झालीये. जरा....काय? येतंय का लक्षात मी काय म्हणतेय ते?"

मला काय बोलावे सुचेना.

"तुला काय माहित तिचा ब्रेक उप झालाय ते?"

"अरे राहुल, तुला आवडते ना ती? म्हणून मग मी तिला फेसबुक वर शोधून काढली. दिसते सुरेख! मानलं हं तुला. बरं, अजून एक गम्मत ऐक!"

मी हात जोडले. "आई! प्लीझ. मला आता कोणतीही गम्मत ऐकायची नाहीये. मला उशीर होतोय..."

"बरं. जा मग. पण नंतर म्हणू नको आईने संगीतलं नाही... ती ही तुझ्या बद्दल विचारत होती बरका. मी तिच्या कंमेंट्स वाचल्यायत."

मला हसावं का रडावं कळेना.

या सोशल मीडिया ने आई बाबांनमध्ये इतका फरक आणलाय! माझेच आई वडील मला ओळखू येत नाहीयेत. एकी कडे माझ्या प्रायव्हसी ची पार वाट लागलीये. पण दुसरीकडे, त्यांच्या एकटेपणाला चांगला उपाय सापडलाय.

असो. रिचा माझ्याबद्दल विचारात होती तर... अरे हो, बगळ्याला सांगायला हवं, फेसबुक चे प्रायव्हसी सेटीन्ग्स बदल आजचे फोटो टाकण्या आधी.... 

Comments

.