आजकाल व्हॉटसॅप च फार वेड लागलाय लोकांना. सकाळ संध्याकाळ नुसता व्हॉटसॅप आणि त्यावर येणारे जोक्स! लहान मुलांपासून ते रिटायर्ड आजी आजोबांपर्यंत घरातले सगळेच ह्या व्हॉटसॅप चे दिवाणे. बरं नुसतेच जोक्स फॉरवर्ड करतात ह्यावर असं काही नाही; ह्याचा उपयोग बऱ्याच वेगवेगळ्या कामांसाठी करता येतो. म्हणजे अर्जंट निरोप द्यायचा असो, किंवा कुणाला महत्वाची माहिती पाठवायची असो; इतकंच काय तर सणा सुदिच्या शुभेच्छा पण ह्या व्हॉटसॅप वरून अगदी सोप्या आणि फटाफट पणे पोहोचवता येतात!
हो, हो, हे सगळं तुम्हाला माहीत आहे; पण तुम्हाला हे माहित आहे का, कि कुणाला शालजोडीतून मारायचं असेल तरीही हा व्हॉटसॅप आपल्या अगदी मस्त उपयोगी पडतो? हो ना, जे म्हणायचंय ते म्हणून घ्या, ते हि एखाद्या मिश्किल विनोदाच्या आडून. किंवा कुणाला लेक्चर द्यायचं असेल तर पाठवा एक मार्मिक कविता; कि वाचणाऱ्याची पार विकेटच गेली पाहिजे!
आता हेच उदाहरण घ्या. बरेच दिवस व्हॉटसॅप वर एक कविता शेयर होत होती. आता नाव नाही आठवत नीटसं पण मर्म हे कि आजकालच्या नवयुवती जीन्स घालतात, अगदी आई झाल्या नंतर सुद्धा - आणि मग जेव्हा आजकाल ची मुलं ह्या आईचा पदर शोधतात, तेव्हा त्यांना तो मिळतच नाही! आता मला हे हि नीटसं आठवत नाहीये कि हि कविता गमतीशीर होती कि हृदयस्पर्शी, पण काही असो, विषय असा काहीसा होता कि जी आई जीन्स घालते तिच्याकडे मायेचा पदर येणार कुठून!
आता हि कल्पनाच किती मजेशीर आहे पहा. म्हणजे जीन्स घातलेली आई आणि साडी नेसलेली आई ह्यात काय फरक आहे हो? म्हणजे, जीन्स घातलेल्या आईची माया, साडी नेसणाऱ्या आईच्या मायेपेक्षा काही वेगळी असते का? का साडीनेसणाऱ्या आईची माया जीन्स घालणाऱ्या आईच्या मायेपेक्षा जास्त असते, तिच्याकडे मायेचा पदर आहे म्हणून? साडी नेसलेली आई वरण-भात आणि ढोबळी मिरची ची भाजी खायला घालते, पण जीन्स घातलेली आई "होममेड पिझ्झा" (कणकेचा बेस आणि तीच ढोबळी मिरची वापरून);म्हणून जीन्स घातलेली आई कमी काळजी घेते का मुलांची? बरं, चिक्की आणि ग्रॅनोला बार्स मध्ये खरंच काय फरक आहे सांगा बरं...
खरा सांगायचं तर आई-मुलाचं नातं हे त्या परमात्म्यानं घडवलेलं सगळ्यात सुंदर नातं आहे. आणि ते केवळ भावनांवर आधारित आहे. नवजात बाळाला काय कळतं, पण ते मूल आईला ओळखतंच ना? त्या तान्ह्या बाळाला काही फरक पडतो का कि आईनं जीन्स घातलीये कि साडी नेसलीये? वय वाढत तसं मुलाची समजूतही वाढते; आणि खरोखर परिपकव विचारांचे आईवडील ज्या घरात असतात त्या घरात मुलांना खरंच काही फरक पडत नाही कि आईने जीन्स घातलीए का ड्रेस घातलाय का साडी नेसलीये. काही मुलं तर घरी येऊन सांगतात सुद्धा, "आई तू त्या निळ्या साडीत खूप छान दिसतेस, उद्या गूढी उभारताना तू हीच साडी नेस!" आता हि आई रोज जीन्स घालत असेलही, पण ती पाडव्याच्या दिवशी साडी नसतेच ना? आणि नाही जरी नेसली, तर पाडव्याचं महत्व काय कमी होणार आहे का?
पण नाही, आपण व्यापक दृष्टिकोन ठेवायचाच नाही असं ठरवलंय ना! मग कुणाला तरी हे खटकतं कि आजकाल मुली जीन्स घालतात, आणि त्याला वाटतं हे जीन्स घालणं पाश्चात्य संस्कृतीचं अनुकरण आहे! मग काय व्हॉटसॅप वर मेसेज आणि कवितांचा मारा! आणि त्या दिवशी जितके लोक वाईट मूड मध्ये असतील, त्या सगळ्यांनी तो फॉरवर्ड करायचा! नुसता त्यांनीच कशाला, इतरांनीही करायचा, कि ज्यांना आपल्या संस्कृतीचा जाज्वल्य अभिमान आहे! आणि फॉरवर्ड करायचा तो पण पाश्चात्य संस्कृती ने आपल्याला बहाल केलेला व्हॉटसॅप वापरूनच!
खरं तर पेहराव आणि वेशभूषा, हे प्रत्येकाने आपापल्या वैयक्तिक पसंतीनं करावं. आणि राहिला प्रश्न संस्कृतीचा, तर, ती मनानं जपली पाहिजे, केवळ पेहेरावानं नव्हे.असंही 'आईचा पदर' हे केवळ रूपकच आहे नं ? मग त्याला रूपकच राहू दिलेलं बरं.
मी लहान असतांना प्रशांत दामलेंचं एक नाटक पहितेल आठवतंय. त्यात एक पात्र साद घालतं - "कोण आहे रे तिकडे?" आणि मग त्याचा साईडकिक उत्तर देतो - "तिकडे कुणीही नाही, सगळे इकडेच आहेत!"
आज त्याचप्रमाणे काहीसं म्हणायची इच्छा होतेय - "कुठे गेला तो आईचा पदर?" - "कुठेही नाही, तो इथेच आहे, तिच्या पिल्लाला जपत आहे, तुम्ही नका काळजी करू!"
Comments
Post a Comment