शिक्षा न देता मुलांना शिस्त लावता येईल का?Image: Designed by Freepik

"प्रिय पालक,
तुमचा मुलगा जेवणाचा डबा न संपवता मधल्या सुट्टीत खेळायला जातो. बाईंनीं वर्गात थांबून डबा आधी संपवायला सांगितले तरीही ऐकत नाही. तरी आपण त्याला ताकीद करावी कि अशी वागणूक भविष्यात सहन केली जाणार नाही "

बाईंनी चिट्ठी पाठवली.

"मम्मी, सही करून देशील?" माझ्या लहानग्याने विचारलं.

मी चिट्ठी वाचून त्याच्याकडे निरखून पाहिलं. माझ्या रंगवण्याची, ओरडण्याची, तो वाट पाहत होता.

मी म्हटलं, " अरे, तुझ्या टीचर ने आधीच नंबर लावला कि! मीच तिला चिट्ठी लिहिणार होते खरं तर, कि माझ्या मुलाचा डबा अर्धवट घरी परत येतो, 'तरी प्लीझ तुम्ही लक्ष द्याल का, म्हणून!"

एक मिनिट पूर्ण शांततेत गेला. आणि मग आम्ही दोघंही भरभरून हसलो!आता तुम्ही म्हणाल अशी काय आई आहे ही! हिचा मुलगा डबा खात नाही, शिक्षकांचं ऐकत नाही; आणि ही हसतेय!?

अहो, पण थोडा विचार कराल का आधी? 

मी त्याची आई आहे आणि एका आईच्या नात्याने त्याला पौष्टिक आणि त्याच्या आवडीचा डबा देणं माझं कर्तव्य आहे. आणि एक शिक्षिका या नात्याने त्याच्या शाळेतल्या वागणुकी बद्दल मला सूचित करणं हे त्याच्या बाईंचं कर्तव्य आहे. आणि माझ्या लहानग्याचं म्हणाल, तर त्याला माहित आहे, कि आईने मस्त चटपटीत कहीतरी आपल्या आवडीचं डब्यात दिलय आणि आपण ते खायला हवं. पण तो तरी काय करणार? 
ग्राउंड  वर जाऊन बेदम धावपळ करण्यात जी मजा त्याला येते, ती वर्गात बसून शांतपणे डबा खाण्यात थोडीच येणार?! 
त्याची आई म्हणून मी हे समजू शकते. मला खात्री आहे, त्याचे शिक्षकही हे जाणतात. पण हि चिट्ठी पाठवणेही त्यांना भाग आहे. आणि म्हणून त्यांनी ती मला पाठवली.  

आता मी ही सिच्युएशन कशी हॅन्डल करू शकते? 

१) चिडून: मी माझ्या लहानग्यावरओरडू शकते, की तू का मी दिलेला डबा खाल्ला नाहीस आणि बाईंना पण अपसेट केलंस? 

किंवा

२) भावुक होऊन: मी त्याला इमोशनल ब्लॅकमेल करू शकते कि मी तुझ्यासाठी पहाटे उठून तुझ्या आवडीचा डबा बनवते आणि तू तो न खाता येतोस, मला किती वाईट वाटतं :(

किंवा 

३) रागावून: मी त्याला शिक्षा करू शकते, टाईम-आऊट देऊ शकते, त्याचा एक दिवसाचा टी.व्ही. बंद करू शकते, 

किंवा 

४) सयंमाने: मी हे सगळं शांतपणे घेऊ शकते. न चिडता, त्याला न रागावता. आणि दुसऱ्या दिवशी डबा भरताना त्याला आठवण करून देऊ शकते कि बाबा रे, आज जरा जास्त डबा संपव, काय; पुन्हा बाईंनी पहिलं तर पंचाईत व्हायची! 

एक पालक म्हजणून ही सिच्यूएशन मी कशी मॅनेज करते, ह्यावर अवलंबून असतं की माझा मुलगा भविष्यात कसा वागतो. आणि त्या दिवशी मला वाटलं कि ऑप्शन ४ माझ्यासाठी बरोबर आहे, आणि मी त्या प्रमाणे वागले. 

मग काय झालं? माझ्या मुलाने दुसऱ्या दिवशी डबा संपवला का? 

खरं सांगायचं तर, नाही संपवला. पण त्याने आज तागायत कधीच डबा रिकामा आणला नव्हता आणि मला तशी अपेक्षा हि नव्हती. पण हो, दुसऱ्या दिवशी त्याने नेहमी पेक्षा थोडं जास्त खाल्लं इतकच. बाईंनी पहिलं तर काही म्हणू शकणार नाहीत ह्याची त्याने खात्री केली.  बस, वेळ निभावून नेली. 

ह्या व अशा अनेक कारणांसाठी लहानपणी आपल्यापैकी बऱ्याच जणांना शिक्षा भोगल्याचे आठवत असेल. आपल्या पैकी बऱ्याच जणांच्या पालकांचं मत होत कि शिक्षा केल्या शिवाय मुलांना शिस्त लागत नाही. माझ्या बरोबरीच्या बऱ्याच पालकांना अजूनही त्यांच्या लहानपणीच्या बऱ्याच 'स्पेशल' शिक्षा आठवत असतील. बघा ना, कुणाला आजही लाटण्याची भीती वाटते, तर कुणाला अंधाराची. कुणी अजूनही गरम चमचा पहिला कि स्वयंपाकघरातून पळ काढतात, तर इतर कुणाचा बंद खोल्यांमध्ये श्वास गुदमरातो. काही लहानपणच्या तीव्र शिक्षा मोठेपणी फोबियाचं रूप घेतात.

मग का आपले पालक आपल्याला अशा तीव्र शिक्षा करत? ते काय दुष्ट होते का? त्यांना त्यांच्या मुलांवर प्रेम नव्हतं? 
नाही. तसं नाहीये. तुम्हाला पटेल अथवा ना पटेल, पण आपल्या पालकांनी जे केलं, ते आपल्या भल्यासाठीच केलं. जसे आज आपण करतो. आपल्या मुलांच्या भल्यासाठी, जे आपल्याला योग्य वाटेल ते. 
आपल्या पालकांनी कदाचित त्यांच्या पालकांकडून धडे घेतले असतील; किंवा नसतील. जसे आपणही धडे घेऊ शकतो आणि ती गाडी पुढे चालू ठेऊ शकतो, आगर नाही. चॉईस आपल्या हातात आहे.

शिक्षेची परिणामकारकता तिच्या भीती पेक्षा जास्त महत्वाची असते . मुलांचं चुकलं असेल, तर शिक्षेचा उद्देश हा असावा कि ती केल्यामुळे मुलांना त्यांची चूक कळायला हवि आणि त्यांनी ती चूक पुन्हा करू नये. केवळ शिक्षेच्या भीतीने त्यांनी वागणूक सुधारली तर त्यांना त्यांची चूक कशी लक्षात येणार? 

लोखंडाला आकार देण्यासाठी लोहार त्यावर खूप जोराने प्रहार करतो हे आपण सगळे जाणतो. पण लक्षात घ्या, लोहार किती जोरात प्रहार करतो  ह्यापेक्षा तो कुठे व कसा प्रहार करतो ह्यावर अवलंबून असतं की तो लोखंडाला किती सुंदर आकार देऊ शकतो .   

पालक म्हणून मुलांना शिस्त लावणे, हे आपलं कर्तव्य आहे, पण आपण ते कसं निभावतो, ह्यामुळे आपल्या मुलांच्या आयुष्यात बराच फरक पडतो असं मला वाटतं.  

तुमचं काय मत आहे? मुलांना शिक्षा देणंच गरजेचं आहे का? की शिक्षा न देता ही मुलांना शिस्त लावता येउ शकेल?   


     

Comments

Post a Comment

.